एका भकास दुपारी रात्रीच्या अपुर्या झोपेचा कोटा पूर्ण करुन उठतानाजन्मलेले दोन बेवारस प्रश्न:
दुनियेतल्या समस्त धर्मग्रंथांना एकत्र आग लावली
तर एखाद्या तरी जिवंत प्रार्थनेचा धूर निघेल का?
आणि ,
तासा- तासागणिक मरत जाणार्या श्रद्धेच्या चिता
दरवेळी कशाने सजवायच्या?
उत्तर: दोन निनावी जांभया आणि पांघरुणांवरुन झटकलेली धूळ.
प्रेम...माया...करुणा...तत्वं...नाती.
या सार्यांच्या औरसपणावर ठळक उभ्या राहिलेल्या प्रश्नचिन्हांच्या
सरळ-वाकड्या गल्ल्यांमधून,
गोंधळवून टाकणार्या अंधार्या कोनाड्यांतूनही
हमखास हाताशी लागणार्या अश्रद्धेच्या आधारावर
काही खेळ मांडावेत.
सोबतीला घ्यावेत
काही झुकलेल्या खांद्यांचे, वाकलेल्या कण्याचे खेळगडी.
प्रेमाचे खेळ.मायेचे खेळ.नात्यांचे खेळ. तत्वज्ञानांचे खेळ.
नियम बनवावेत दुबळ्या मनगटाच्या जिवावर.
नियम वाकवावेत, मोडावेत, बदलावेत आपापल्या सोयींच्या जिवावर.
नियमांशी खेळता नाही आलं तर खेळगडी बदलावेत.
अगदीच जमलं नाही तर खेळ बदलून पाहावा.
जतन करुन ठेवावीत कलेवरं समस्त तत्वज्ञानांची
खेळाच्या अस्सलपणाचे पुरावे म्हणून.
पुन्हा एकदा
कुठल्याशा भकास दुपारी
कुठल्यातरी मृत प्रश्नांच्या उत्तरादाखल
आपलेसे करावेत काही पुळचट युक्तीवाद.
आणि
करुन ठेवावी अजाणपणे
आपल्याच कुठल्यातरी निर्दोष वंशजाच्या काटछाटीची तरतूद.
कुणातरी निष्पाप वंशजाच्या घुसमटीची तरतूद.