“हम ने माना के तगाफ़ुल ना करोगे लेकिन,
खाक हो जायेंगे हम, तुम को खबर होने तक....”
नको...सगळा आकांत नाही सोसवणार...
पण आकांताची झलक चालेल...
त्वचेला जाणवेल न जाणवेलशी....
चवीपुरते रोमांच आणणारी.....
उसासे सोडण्यासाठी पुरेलशी...
लिखाणासाठी उत्तेजित करेल एवढी.....आणि तेवढीच....
त्याहून नको...
अंग पोळणारी नको....
हाडांमध्ये मुरणारी...स्नायू पिळवटून टाकणारी वेदना नको...
मस्तकात भिनणारी कळ नको....
कडेकडेने येणारा दुःखाचा अंदाज घेत त्याचं भांडवल करायचं...
ऎकतोयस ना गालिब?
तुझ्याच जिवावर तर दुःखाचे महाल उभारले आम्ही...
मैफ़िली सजवल्या..
एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून नजरेने दिलासे पुरवले...
काय केलं नेमकं माहिताय?
ती अंधारी खोली टाळलीच........
कारण प्रत्येकाची खोली निरनिराळी...
तिथे घोळक्याने नाही जाता येत.....
केलं ते फ़क्त खिडकीतून डोकावणं....
बाहेरच्या झगमगाटाला हाताशी धरुन.....
गाफ़िल नजरांनी बेफ़िकिरीचा चष्मा चढवला.....
आपापली सार्वजनिक वर्तुळं आखली अन् सीमा सुरक्षित केल्या...
वर्तुळंच का म्हणशील तर कोपरे टाळले....अंधार टाळला....
सगळ्या वर्तुळांना घेरून असणारा अंधार आम्ही वर्तुळं आखून टाळला...
तुझ्या निमित्ताने हा आणखी एक उमाळा सार्वजनिक केला....
आणखी बेडौल हातवारे दुःखाची जाणीव दर्शवण्यासाठी.....
पण तू मात्र म्हणतच राहशील ना....
“जब की तुझ बिन नही कोई मौजुद...
फ़िर ये हंगामा, ऎ खुदा क्या है..?”
..................?

No comments:
Post a Comment